
मालवणी येथील तीन मजली इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेमुळे मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तब्बल 407 अतिधोकादायक इमारती असून यात खासगी आणि पालिकेच्या अखत्यारीतील इमारतींचा समावेश आहेत. पालिकेने 2021-22 सालासाठी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यामध्ये 59 इमारती पालिकेच्या मालकीच्या तर 322 खासगी मालकीच्या असून 26 सरकारी इमारती आहेत. सर्वाधिक धोकादायक इमारती पालिकेच्या एच/पश्चिम वॉर्डमध्ये येणाऱया वांद्रे आणि एन वॉर्डमध्ये येणाऱया घाटकोपर परिसरात आहेत. गेल्या वर्षी धोकादायक इमारतींची संख्या 443 होती.
पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून संबंधित इमारतीत रहिवासी असल्यास ती तातडीने रिकामी करण्याचे निर्देश दिले जातात. मात्र पुनर्वसनाची नसलेली खात्री आणि पर्याय नसल्याने रहिवासी घर रिकामे करीत नाहीत तर काही वेळा न्यायालयात प्रकरण असल्याने पालिकेला कारवाई करता येत नाही. मात्र अतिवृष्टीमुळे अनेक वेळा दुर्घटना घडल्यास हा प्रश्न ऐरणीवर येतो. पालिकेकडून शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे अशा इमारती सी-1 या प्रकारात अर्थात अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात. अशा अत्यंत धोकादायक 407 इमारती मुंबईत आहेत. तीन वर्षांपूर्वी तब्बल 619 अतिधोकादायक इमारती आढळल्या होत्या. गेल्या वर्षी ही संख्या 443 होती, मात्र धोकादायक इमारतींपैकी काही इमारती पाडून टाकण्यात आल्या तर काही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. काही इमारतींवरील कारवाईला न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्याने पालिकेने कारवाई केलेली नाही. दरम्यान, धोकादायक इमारतींच्या यादीत ‘ए’ विभागातील बेस्टच्या मालकीची मेहेर मेन्शन, लालबागचे गणेश टॉकीज, शीव येथील पंजाबी कॉलनीतील सर्व 25 इमारती धोकादायक आहेत.
धोकादायक इमारती
एच-वेस्ट (वांद्रे पश्चिम) – 49
एन विभाग (घाटकोपर) – 47
के-पश्चिम (अंधेरी-जोगेश्वरी पश्चिम) – 36
टी (मुलुंड) – 35
के-पूर्व (अंधेरी व जोगेश्वरी पूर्व) – 34
एफ-उत्तर (शीव-वडाळा) – 26
पी-उत्तर (मालाड) – 25
एच-पूर्व (वांद्रे पूर्व) – 18
अशी होते कार्यवाही
पालिकेच्या धोरणानुसार 30 वर्षे जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी (ऑडिट) केली जाते. त्यात ज्या इमारती धोकादायक आढळतात अशा इमारतींना घरे रिकामी करण्यासाठी 354 ची नोटीस बजावली जाते. यामध्ये काही जण न्यायालयात गेल्यास पालिकेची कार्यवाही थांबते पिंवा त्यांना इमारत धोकादायक वाटत नसेल तर ते पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे गेल्याने कार्यवाही होत नाही. पालिकेकडून अशा इमारतीत राहणाऱयांकडून स्वतŠच्या जबाबदारीवर राहत असल्याचे हमीपत्र लिहून घेतले जाते.
म्हाडाच्या 21 इमारती अतिधोकादायक
म्हाडाने नुकतेच मुंबईतील सुमारे 15 हजार उपकरप्राप्त (सेस) इमारतींमधील सर्वेक्षण केले असून त्यात 21 इमारती अतिधोकादायक आढळल्या. त्यात गेल्या वर्षीच्या 10 इमारतींचा समावेश आहे. अतिधोकादायक इमारतींमध्ये 460 निवासी व 257 अनिवासी असे 717 रहिवासी आहेत. त्यापैकी 193 रहिवाशांनी अन्यत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. तसेच 20 रहिवाशांचे संक्रमण शिबिरात स्थलांतर केले आहे. शिल्लक 247 रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.


























































