नगर जिल्ह्यात 416 मतदान केंद्रावर होणार वेब कास्टिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातील 416 मतदान केंद्रावर लाईव्ह वेब कास्टिंग करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली आहे. यामध्ये 16 सखी,10 दिव्यांग मतदान केंद्र, 10 आदर्श मतदान केंद्र यांचा समावेश आहे.

जिल्ह्यामध्ये 3,722 मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्या मतदान केंद्रावर काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी वेब कास्टिंगची सुविधा करण्यात आली आहे. या सुविधेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना त्या मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने होत आहे, याचे इंटरनेटद्वारे लाईव्ह वेबकास्ट लाईव्ह दिसणार आहे. नगर जिल्ह्यातील 416 मतदान केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सर्व सुविधा सीसीटीव्हीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासंदर्भातले सर्व काम हे बीएसएनएल कंपनीला देण्यात आले आहे. या अगोदर फक्त 378 मतदान केंद्रांवर ही सुविधा होती. मात्र निवडणूक आयोगाने अन्य मतदारसंघाचा समावेश करावा असे निर्देश दिले होते, त्या निर्देशानुसार हा बदल करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील दहा टक्के मतदान केंद्राचा यामध्ये समावेश आहे.

ज्या ठिकाणी वेब कास्टिंग होणार आहे यामध्ये सखी दिव्यांग व आदर्श मतदान केंद्रांचा समावेश आहे. त्यांची एकूण संख्या 38 आहे. या निवडणुकीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये एक सखी मंच आहे. नगर शहरामध्ये चार तर कर्जत-जामखेड मध्ये दोन सखीमंच आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये एक आदर्श मतदान केंद्राचा समावेश आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग मतदान केंद्रांमध्ये शेवगाव नगर शहर सोडून इतर दहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक याप्रमाणे दिव्यांग मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी 1162 वाहनांचा वापर करण्यात येणार असून यात एसटी बस 528 जीप 504 टेम्पो ट्रॅव्हल्स 55 आणि मालमोटार 62 यांचा समावेश आहेत. ही सर्व वाहने जीपीएसद्वारे जोडण्यात आली असून त्याचे कॉन्ट्रॅक्ट सरकारी बीएसएनएल कंपनीला देण्यात आले आहे.