
थर्टी फर्स्टचे काऊंडटाऊन आता सुरू झाले असून अनेकांना वेध लागले आहेत ते रायगडातील समुद्रकिनाऱ्यांचे. निसर्गाच्या सान्निध्यात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईसह बच्चेकंपनीही उत्सुक आहे. थर्टी फर्स्टच्या पाश्र्वभूमीवर पोलीस आतापासूनच इन अॅक्शन झाले असून रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या बीचवर 42 वॉर्डनचा वॉच राहणार आहे. समुद्रकिनाऱ्यांवर कोणतीही गडबड होऊ नये तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हे वॉर्डन सकाळपासून संध्याकाळपर्यंत सज्ज राहणार आहेत. त्यांना पोलिसांच्या वतीने खास प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, किहीम, आवास, मांडवा, रेवदंडा, मुरुड, काशीद, दिघी सागरी, श्रीवर्धन, दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यांवर बीच वॉर्डन नेमण्यात आले आहेत. त्यांना जिल्हा सुरक्षा शाखेमार्फत प्रशिक्षण व ओळखपत्र देण्यात आले आहे. ते संबंधित पोलीस ठाण्याच्या नियंत्रणात काम करणार असून सकाळी 7 ते 11 आणि सायकांळी 3 ते 7 अशा दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना कोणतीही अडचण किंवा समस्या उद्भवल्यास तत्काळ त्यांना मदत करण्यात येईल.
पर्यटकांना भरती-ओहोटीच्या वेळापत्रकाबाबत ड्युटीवरील वॉर्डन वेळोवेळी माहिती देणार आहेत. समुद्रकिनारी अचानक अपघात झाल्यास तत्काळ मदत पुरवण्यात येईल.
गरजूंना वैद्यकीय मदतदेखील देण्यात येणार आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील वॉटर स्पोर्ट्स आणि खाद्यविक्रेते यांच्याकडून पर्यटकांसोबत कोणताही गैरप्रकार होत असल्याचे आढळून आल्यास त्याची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात येणार आहे.
समुद्रकिनाऱ्यावर थर्टी फर्स्ट साजरा करीत असताना मद्यधुंद अवस्थेतील काही तरुण महिला तसेच तरुणींची छेडछाड काढतात. अशा तरुणांवर विशेष लक्ष.
येथे ठेवणार विशेष लक्ष
अलिबाग, वरसोली, पाच, भट्टी विभाग, दिवेआगर किनारा, एमटीडीसी, सावित्री पाखाडी, हनुमान पाखाडी, गोठणेश्वर मंदिर, काशीद, मुरुड, किहीम, मांडवा, आवास, जीवना बंदर, श्रीवर्धन फेस्टिव्हल किनारा, श्रीवर्धन मुख्य किनारा, आरवी किनारा, हरिहरेश्वर येथे बीच वॉर्डन तैनात करण्यात येणार आहेत.



























































