बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये कोविड कक्षामध्ये उपचार घेणाऱ्या एका 68 वर्षीय महिलेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात 20 वर पोहचली असतानाच आणखी 44 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना वार्डामध्ये उपचार घेत असलेल्या एका 68 वर्षीय महिलेचा उपचार घेताना बुधवारी सकाळी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी गेवराई शहरातील गजानन नगर भागातील या महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेला श्वसनाचा त्रास होत होता, प्रकृतीही चिंताजनक झाली होती. बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 20 वर पोहचली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा वाढत असताना कोरोना पॉझिटिव्ह आढणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. बुधवारी पहाटे आलेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यामध्ये 44 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात 23 जण बीड शहरातील आहेत. दोघे जण शिरूर, 8 जण गेवराई, 3 जण केज, 5 परळी, 1 अंबाजोगाई, 1 पाटोदा, 1 माजलगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. बीड शहरामध्ये तब्बल 23 रूग्ण आढळल्याने शहरामध्ये चिंतेचे वातावरण आहे. आढळलेले रुग्ण सावता माळी चौक 1, जुने पोलीस स्टेशन 1, सय्यदनगर 1, जिजामाता चौक, माळी गल्ली, शाहुनगर, सावतामाळी चौक, रविवारपेठ, विप्रनगर, क्रांतीनगर, लोणारपुरा, अजमेर नगर, दुधाळगल्ली, बारगजवाडी, चंपावतीनगर आदी भागातील आहेत.


























































