
कोरोनाच्या लढाईत आणखी एक दिलासा देणारी बातमी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील 23 राज्यांमधील 47 जिल्हय़ांत गेल्या 28 दिवसांपासून तर इतर 45 जिल्हय़ांमध्ये गेल्या 15 दिवसांत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. विशेष म्हणजे हे असे जिल्हे आहेत जिथे सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते.
देशातील 14378 रुग्णांपैकी 4291 रुग्ण हे निझामुद्दीनमधील तबलिगी जमात मरकजशी संबंधित आहेत. 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे तबलिगीचे रुग्ण असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले असून तामीळनाडूत 84 टक्के, दिल्लीत 63 टक्के, 79 टक्के तेलंगणा, 59 टक्के उत्तर प्रदेश आणि आंध्रात 61 टक्के रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. गेल्या 24 तासांत 991 रुग्ण आढळले असून 43 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची एकूण संख्या 480 इतकी झाली आहे. तर एकूण 1992 रुग्ण बरे झाले आहेत.
मृत्यू दर 3.3 टक्के
देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर 3.3 टक्के इतका असून 45 वयापर्यंतच्या रुग्णांचे 14.4 टक्के, 45 ते 60 (10.3 टक्के), 60-75 (33.1 टक्के) आणि 75 पेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांचा मृत्यू दर हा 42.2 टक्के इतका आहे.
























































