
सामना प्रतिनिधी । मुंबई
पालिकेचे विद्यार्थीच आता आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करणार आहेत. यासाठी दररोज 90 विद्यार्थ्यांच्या टीमला आणि शिक्षक-मुख्याध्यापकांना तीन दिवस आपत्कालीन परिस्थितीशी लढण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी पालिका अधिकार्यांसोबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सुरत येथे कोचिंग क्लासला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मुंबईतील शाळा-क्लासमधील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक-मुख्याध्यापकांनाही आपत्कालीन स्थितीत काय करावे, कोणत्या खबरदारी घ्याव्यात, काय करावे-काय करू नये याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या बैठकीप्रसंगी उपआयुक्त मिलीन सावंत, शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.
31 जुलैपर्यंत अहवाल सादर करा
- पालिकेच्या 450 इमारतींमध्ये महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व अग्निसुरक्षा अधिनियम 2006 या अधिनियमानुसार अग्निसुरक्षा यंत्रणेचे लेखापरीक्षण झाल्याची माहिती अंजली नाईक यांनी दिली. शिवाय अनुदानित, विनाअनुदानित 1100 शाळांपैकी 402 शाळांचे अग्निसुरक्षा ऑडिट झाल्याचेही त्यांनी सांगितले.
- शिवाय मुंबईतील सर्व कोचिंग क्लासेस, खासगी-सर्व बोर्डाच्या शाळांचा फायर ऑडिट रिपोर्ट 31 जुलैपर्यंत सादर करावा असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. खासगी क्लासेसच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालिका नियमात कोणतीही तरतूद नसल्याने याबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन कार्यवाही करावी असे आदेशही शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी पालिका प्रशासनाला दिले.

























































