
नवी मुंबई महापालिकेच्या येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ९ लाख ४८ हजार ४६० मतदार मतदान करणार असून त्यामध्ये ४५ हजार ५८८ इतके दुबार मतदार आहेत, अशी जाहीर कबुली नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आज दिली. सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात यंदा १ हजार ४८ मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत. मात्र त्यापैकी एकही मतदान केंद्र हाऊसिंग सोसायटीमध्ये नसणार आहे असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. आठ ठिकाणी मोजणी होणार असल्याने निकाल दोन तासांत लागणार आहे.
साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची फौज
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची फौज तैनात ठेवली आहे. त्यापैकी ५ हजार ७०५ कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर काम करणार असून उर्वरित कर्मचारी हे राखीव असणार आहेत, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रशासनाने कशा पद्धतीने तयारी केली आहे याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे म्हणाले, नवी मुंबई शहरात प्रथमच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रशासनाने जनजागृतीवर विशेष भर दिला आहे. जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. उमेदवार जर मतदान केंद्र असलेल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत असेल तर त्या सोसायटीमधील मतदारांवर दबाव येण्याची शक्यता असते, त्यामुळे हाऊसिंग सोसायटीमधील मतदान केंद्र यंदा बंद करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर मतदारांची संख्या ८०० ते ८५० इतकी ठेवण्यात आली आहे, असे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, लेखा अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त भागवत डोईफोडे आदी उपस्थित होते.
































































