लाल किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न; 5 अवैध बांगलादेशी नागरिकांना अटक, सुरक्षेत कुचराई करणारे 7 पोलीस निलंबित

दिल्लीतील लाल किल्ला परिसरामध्ये घुसण्याचा प्रयत्न सुरक्षा दलाने उधळून लावण्यात आला आहे. पोलिसांनी 5 अवैध बांगलादेशी नागरिकांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी 20 ते 25 वयोगटातील असून अवैध मार्गाने ते हिंदुस्थानमध्ये घुसले होते आणि दिल्लीत मजुरीचे काम करत होते. त्यांच्या ताब्यातून बांगलादेशी कागदपत्रही जप्त करण्यात आली असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. स्वातंत्र्य दिन अवघ्या 10 दिवसांवर आला असताना ही कारवाई करण्यात आल्याने दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे.


7 पोलीस निलंबित

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार असल्याने येथे अभेद्य सुरक्षा कवच तयार करण्यात आला आहे. मात्र या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी 7 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यात कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलचा समावेश आहे.

दिल्ली पोलीस 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचे मॉक ड्रिल करत आहे. शनिवारी स्पेशल सेलची एक टीम मॉक ड्रिल करत होती. सिव्हील ड्रेसमध्ये ही टीम डमी बॉम्ब घेऊन लाल किल्ला परिसरात घुसली. मात्र तिथे तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना डमी बॉम्बचा सुगावाही लागला नाही. यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.