
सांगली जिह्यात ‘एच-3 एन-2’चे पाच रुग्ण आढळून आले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात तीन आणि ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाने दिल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.
तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा विषाणूचा प्रसार झाला आहे. काही जिह्यांमध्ये ‘एच-3 एन-2’चे रुग्ण आढळत होते. त्याचा शिरकाव आता सांगली जिह्यातही झाला आहे. जिह्यातही पाच रुग्ण आढळून आले. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात तीन आणि ग्रामीण भागात दोन रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत. त्यांच्यावर घरीच उपचार करून घरीच उपचार करण्यात आले होते. याशिवाय त्या रुग्णांच्या संपर्कातील दहाजणांची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून जिह्यातील 64 प्राथमिक आरोग्य केंद्र व 320 उपकेंद्रांच्या ठिकाणी ताप, सर्दी व खोकला अशी लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांच्या तपासणी व उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. या कक्षामध्ये रुग्णांच्या आरोग्य तपासणीसह एच-3 एन-2 आजाराच्या निदानासाठी आरटीपीसीआर स्वॅब घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविले जातात. तसेच, सर्व प्राथमिक आरोग्य क्रेद व उपकेंद्रांच्या ठिकाणी पुरेसा औषधसाठा ठेवण्यात आला आहे.
‘त्या’ विद्यार्थ्याच्या संपर्कातील पाचजणांना कोरोनाची लागण
कोकणातून फिरून आलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याचा नगरमध्ये मृत्यू झाला. या विद्यार्थ्याला कोरोना, तसेच ‘एच 3, एन 2’ व्हेरिएंटची बाधा झाल्याचे समोर आले होते. सतर्क झालेल्या आरोग्य यंत्रणेने तातडीने संपर्कातील मुलांच्या तपासणी केल्या; परंतु त्यात कोणीही पॉझिटिव्ह आले नाही. मात्र, होस्टेलमधील इतर पाचजणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यापैकी दोघांमध्ये लक्षणे आढळून आली आहे. या दोघांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणांनी दिले आहेत. जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत या ठिकाणी सात दिवस सर्वेक्षण केले जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्याच्या मृत्यूची कारणे शोधण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या आदेशानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 15) दहाजणांची वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली.




























































