कश्मीरात दहशतवादी हल्ला; लष्कराच्या वाहनावर ग्रेनेडचा मारा, पाच जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहशतवादी हल्ल्याने जम्मू-कश्मीर पुन्हा हादरले आहे. राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणाऱया ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्यामुळे ट्रकला भीषण आग लागली. त्यातील पाच जवान शहीद झाले, तर एक जवान जखमी झाला. पूंछ जिल्हय़ात भीमबर गली ते संगिओतकडे दुपारी तीनच्या सुमारास हल्ला झाला. दरम्यान, लष्कराने युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

सुरुवातीला लष्कराच्या वाहनावर वीज कोसळली, वाहनामध्ये रॉकेल असल्याने आग भडकल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता, मात्र सायंकाळी लष्कराच्या नॉदर्न कमांडने हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट केले. लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना हल्ल्याची माहिती दिली.

दहशतवादी जंगलात पळाले

हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले असून लष्कराने युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

पाऊस कोसळत असतानाच…
राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना घेऊन लष्कराचा ट्रक पूंछ जिल्हय़ातील भीमबर गली येथून संगिओतकडे जम्मू महामार्गावरून जात होता. मुसळधार पाऊस आणि दाट धुके पसरले होते. त्याचाच फायदा घेऊन दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा मारा केला. लष्कराच्या ट्रकने पेट घेतला आणि आग भडकली.