
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले असून नदीकाठच्या गावात पूर येऊन जिवीत, वित्तहानी अथवा कोणतीही आपत्ती निर्माण होऊ शकते. याकरिता नदीकाठची गावे व नदीकिनारी राहाणाऱ्या नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून या धरणातून सध्या 5 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढलेली असल्याने कुठल्याही प्रकारची आपत्ती उद्भवू नये म्हणून जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील गेवराई, माजलगांव आणि परळी तालुक्यातील गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहास वेग असून अचानक पाणी पातळीत वाढ होत असल्याने पूररेषेमध्ये कोणीही राहू नये. आपण स्वत:, आपली जनावरे, साधन सामुग्री नदीपात्रात असल्यास तातडीने नदीपात्राबाहेर घेऊन जावी. तसेच आपल्या परीसरातील, गावातील लोकांना याबाबत सावध करावे. या अनुषंगाने कोणी दुर्लक्ष करत असेल तर स्थानिक प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना द्यावी.
याचबरोबर नदी पुलावरून प्रवास करणारे नागरिक, पूर पाहाण्यासाठी, उत्साहाने, सेल्फी काढण्याच्या उद्देशाने पाण्याच्या जवळ जावू नये. लहान मुले, महिला, वृद्ध व्यक्ती यांनी अनवधानाने जीव धोक्यात घालू नये यासाठी सगळ्यानी सावधगिरी बाळगावी असे जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी सांगितले आहे.
प्रशासनाच्या वतीने यापूर्वी गेवराई तालुक्यातील 32 गावे, माजलगांव तालुक्यातील 26 गावे व परळी तालुक्यातील 5 असे एकूण 63 गोदाकाठच्या गावातील स्थानिक व तालुका प्रशासनाच्या वतीने सावध करण्यासाठी सूचित केले आहे. याच बरोबर शासनाच्या महसूल, पोलिस, ग्रामविकास यासह आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभाग, महावितरण, पुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


























































