
श्रावण महोत्सव म्हणजे चटपटीत, खमंग आणि चमचमीत रेसिपींची पर्वणीच. त्यानुसार आज श्रावण महोत्सव 2019 च्या पाककला स्पर्धेत चेंबूर परिसरातील गृहिणींनी उपवासाचा पराठा, रसाळ पराठा, पौष्टिक पराठा, गावरान ठसका पराठा, रानभाज्यांचे थेपले, मेथीचे थेपले अशा खमंग आणि चटपटीत रेसिपी सादर केल्या. सर्वच स्टॉलवर थेपले-पराठय़ांचा मेन्यू असतानाही त्यांची चव आणि लज्जत काही न्यारीच होती. त्यामुळे उत्कृष्ट रेसिपी निवडताना परीक्षकांना मंगळवारी मोठी कसरत करावी लागली. दैनिक ‘सामना’ या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे.
पितांबरी रुचियाना प्रस्तूत मिती क्रिएशन निर्मित उत्तरा मोने सादर करत असलेल्या श्रावण महोत्सव पाककला स्पर्धेची प्रथमिक फेरी आज चेंबूर महिला समाज यांच्या सहकार्याने चेंबूर येथे मोठय़ा उत्साहात पार पडली. थेपले किंवा पराठा हा विषय घेऊन झालेल्या या प्राथमिक फेरीत चेंबूर परिसरातील सवाशेहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवत आपल्या थेपले-पराठय़ाच्या सजवलेल्या डीश परीक्षकांसमोर ठेवल्या. पितांबरीच्या वतीने शिवानी नेमावरकर, माधवबागच्या डॉ. विद्या, फॅमिली स्टोअरच्या कला जोशी, पूर्णब्रह्मतर्फे संगीता नवाले, वैशाली वाघ, सरोज स्वीटस्च्या मनीषा मराठे, शुभांगी देवचके, विजय कामेरकर, संगीता ढोले, पराग बापट यांनी परीक्षक म्हणून तर मुख्य परीक्षक म्हणून शेफ तुषार प्रीती देशमुख, न्यूट्रीशनीस्ट नमिता नानल आणि स्पर्धेच्या आयोजिका उत्तरा मोने यांनी काम पाहत पाच उत्कृष्ट रेसिपींची विजेते म्हणून निवड केली. यावेळी विजेत्यांचा शिवसेनेच्या माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांच्या हस्ते परितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. महिला विभाग संघटक रिटा वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पितांबरी, तन्वी हर्बल्स, माधवबाग, विको, एनकेजीएसबी बँक, दैनिक ‘सामना’, फॅमिली स्टोअर्स, आस्वाद हॉटेल, सरोज स्वीटस्, पूर्णब्रह्म, प्रथा यांच्या वतीने सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.
प्राथमिक फेरीचे विजेते
सुजाता बाणावलकर (राणभाजी थेपले), रिद्धी म्हात्रे (भोपळ्याच्या सालीचे थेपले), अर्चना कुमार (चिवडा पराठा), वैष्णवी गोगीरवार (ओटस् पराठा), स्मिता कदम (मिक्स भाज्यांचा पराठा). उत्तेजनार्थ : सुप्रिया साळवी (दाभेली पराठा), केतकी वैद्य (चीज सोया पनीर पराठा), स्मिता सुर्वे (शेंगदाणा पराठा).



























































