
सामना प्रतिनिधी, मुंबई
मालाडच्या पिंपरीपाडा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली. त्याचप्रमाणे जखमींना पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. यामध्ये अनेक जखमींना गंभीर दुखापत झाली असून त्यांना आणखी मदत मिळावी अशी मागणी शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन त्यांच्यासमोर मालाड पिंपरीपाडा दुर्घटनेतील जखमी तसेच झोपडय़ा उद्ध्वस्त झालेल्यांच्या पुनर्वसनाचा विषय शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आला. यावेळी गजानन कीर्तिकर तसेच सुनील प्रभू यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले. दुर्घटनेतील सुमारे 70 जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यांना पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली असली तरी ही मदत पुरेशी नसून त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता आणखी मदतीची आवश्यकता असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी या जखमींना आर्थिक मदतीची गरज असल्याचे लक्षात घेऊन त्यांना 50 हजार रुपयांची मदत करण्यात येईल अशी घोषणा केली. या बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिक नितीन करीर आदी उपस्थित होते.
दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करणार
मालाड दुर्घटनेतील अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्याचप्रमाणे अनेकांची घरे धोकादायक स्थितीत आहेत. या कुटुंबांचे व्यवसाय, नोकरी, मुलांच्या शाळा, उद्योगधंदे हे मालाड व लगतच्या परिसरात आहेत. त्यांचे पुनर्वसन मालाडमध्येच होणे आवश्यक आहे. या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याकरिता झोपडपट्टी सुधार योजनेमार्फत महापालिकेला प्रकल्पग्रस्त बाधितांच्या पुनर्वसनांतर्गत उपलब्ध होणाऱ्या सदनिकांमध्ये विशेष बाब म्हणून पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी गजानन कीर्तिकर, सुनील प्रभू यांच्याकडून करण्यात आली. यावर एसआरएअंतर्गत ज्या पीएपी उपलब्ध होतील त्यामध्ये या दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले.























































