
2025मध्ये हिंदुस्थानातील एक हजारहून अधिक धरणे सुमारे 50 वर्षांची होतील. 2050मध्ये जगातील बहुतांश लोकसंख्या 20व्या शतकात बांधल्या गेलेल्या हजारो धरणांच्या लगत वसलेली असेल व हिंदुस्थानसह अन्य देशांमधील अशी जीर्ण धरणे भविष्यात अतिशय धोकादायक ठरू शकतात, असा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कॅनडास्थित पाणी, पर्यावरण आणि आरोग्य संस्थेने ‘एजिंग वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर ः अॅन इमर्जिंग ग्लोबल रिस्क’ नावाचा हा अहवाल तयार केला आहे. जगातील 58 हजार 700 धरणांपैकी बहुतांश मोठी धरणे 1930 ते 1970यादरम्यान बांधण्यात आली असून 50 ते 100 वर्षांकरिता त्यांची उभारणी करण्यात आली आहे. काँक्रीटद्वारे बांधण्यात आलेले मोठे धरण 50 वर्षांनंतर जीर्ण होते. त्यामुळे जगातील हजारो धरणे सध्या धोकादायक स्थितीत असून त्यांचे बांध फुटण्याचा धोका आहे, असे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे.