
>> विशाल अहिरराव
इतिहास नेहमी राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, कला, भाषा अशा विविध अंगांनी अभ्यासला जातो. तो अभ्यासताना विविध संस्कृतीतील संघर्ष अनेकदा समोर येतो; मात्र संस्कृती नेहमी एकमेकांच्या विरोधात नाही, तर सांस्कृतिक जडणघडणीत पूरकही ठरलेल्या आहे. असाच भव्य इतिहास सिंधू संस्कृतीचा आहे. सर्वसामान्यपणे सामान्य वर्गाला याबद्दल जाणून घेण्यासाठी पुस्तकाचा मार्ग असतो. मात्र मुंबईकरांसाठी एक अनोखी संधी चालून आली आहे. पाच हजार वर्षांपूर्वीच्या, कलाकौशल्याने नटलेल्या, भव्य आणि प्रगत अशा सिंधू संस्कृतीचा काळ प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ‘नेटवर्क ऑफ द पास्ट’ हे हिंदुस्थान आणि प्राचीन संस्कृतींचा ऐतिहासिक संबंध उलगडणारे अभ्यास दालन सुरू होणार आहे.
एख्याद्या गोष्टीचा अभ्यास करताना केवळ त्या गोष्टीचाच विचार केला जात नाही, तर तिच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टीही कशा प्रकारे एकमेकांशी जोडलेल्या असतात. तसेच या संस्कृती केवळ एकमेकांच्या विरोधात नसून जोडलेल्या आहेत असे संस्कृतींचे ऐतिहासिक जाळे आणि प्राचीन संस्कृतींच्या केंद्रस्थानी असलेली आपली सिंधू संस्कृती याला अधोरेखित करणारे हे अभ्यास दालन असणार आहे. हडप्पा, मेसोपोटॅमिया, इजिप्त, चीन, पर्शिया, ग्रीस, रोम अशा विविध संस्कृतींचा एकाच ठिकाणी एकत्र अभ्यास करता येणार आहे.
सिंधू संस्कृतीचा पश्चिम युरोपपासून जपानपर्यंत, अटलांटिक ते पॅसिफिक इतक्या मोठय़ा भागात दबदबा होता. जगातील विविध संस्कृतींचा अभ्यास करताना सिंधू संस्कृतीचा संबंध कसा येतो यावरून सांस्कृतिक इतिहासात हिंदुस्थानचे महत्त्व अधोरेखित होते. हा भव्यदिव्य काळ सर्वांना अनुभवता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या या नव्या दालनात सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीच्या दूर्मिळ वस्तू प्रत्यक्ष पाहता येणार आहेत. यामध्ये मातीची भांडी, खेळणी, स्त्री–पुरुषाचे पुतळे, चित्रे, कलाकुसरीच्या वस्तू, वस्त्रे यांचा समावेश असणार आहे अशी माहिती मिळते. हिंदुस्थानसह जगभरातील 15 संग्रहालयांमधून आणलेल्या 300 हून अधिक विलक्षण पुरातत्त्व वस्तू मुंबईकरांना याचि देही याचि डोळा पाहता येणार आहे. 13 डिसेंबर 2025 रोजी हे अभ्यास दालन खुले होणार आहे.































































