
जिल्ह्यात दीड महिन्याच्या कालावधीत 229 मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या 51 टक्के पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 448 मिलिमीटर पाऊस पडत असतो. खरीप हंगामातील मूग, बाजरी, सोयाबीन, उडीद, वाटाणा, कपाशी, तूर ही पिके चांगला पाऊस झाल्याने बहरली आहेत.
नगर जिल्ह्यात हवामान विभागाने जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, मध्यंतरी काहीकाळ पाऊस गायब होता. आता पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची सरासरी 4 लाख 48 हजार 904 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असते. जून महिन्याच्या दुसऱया आठवडय़ापासून मान्सून पावसाला सुरुवात होते. या वर्षीही वेळेवर पावसाला सुरुवात झाली. दमदार पावसामुळे शेतकऱयांनी खरीप हंगामातील पिकांची चांगली पेरणी केली आहे. कडधान्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी या पिकांकडे वळाले आहेत. उडदाचे क्षेत्र तिप्पट झाले आहे. तुरीचे दुप्पट वाढले आहे. कपाशीमध्ये मात्र घट झाली आहे. सध्या साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाने दडी मारली होती. खरिपातील पिके हातातून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. जुलैच्या दुसऱया आठवडय़ापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. पिके आता चांगलीच बहरली आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये नवीन पावसाची आवक सुरू झाली आहे. जून महिन्यात सर्वच तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. संगमनेर तालुक्यात सरासरीपेक्षा अल्पसा कमी पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी 140 मिलिमीटर पाऊस झाला. जून महिन्याच्या सरासरीच्या 130 टक्के हा पाऊस होता. जुलै महिन्यात 76 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 229 मिलिमीटर पाऊस झाला आहे. शेवगाव तालुक्यात सर्वाधिक 296 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वांत कमी संगमनेर तालुक्यात 171 मिलिमीटर पावसाची नोंद आहे.
तालुका पाऊस टक्केवारी
नगर 228 47.6
पारनेर 197 47.7
श्रीगोंदा 263 64.4
कर्जत 242 54.2
जामखेड 245 42.7
शेवगाव 296 64
पाथर्डी 247 52.4
नेवासा 224 52.3
राहुरी 230 53.4
संगमनेर 171 48.9
अकोले 233 47.8
कोपरगाव 216 53.5
श्रीरामपूर 266 57.5
राहाता 195 43.1




























































