कोरोनामुक्त जिल्ह्यांची संख्या वाढली, 14 दिवसांत 54 जिह्यांत एकही नवा रुग्ण नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुक्त जिल्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. ही दिलासादायक बातमी आहे. 14 दिवसांत 54 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, आजपासून (दि. 20) देशातील कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागातच अटी-शर्थींसह लॉकडाऊनमध्ये सूट दिली जाईल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शनिवारपर्यंत देशात कोरोनामुक्त जिह्याची संख्या 45 होती. त्यात 24 तासांत 9 जिल्ह्यांची भर पडली आहे. 14 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडला नाही, असे 54 जिल्हे देशात आहेत. 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील हे 54 जिल्हे आहेत, असे अग्रवाल यांनी सांगितले.

रुग्णांची संख्या 15700 वर; 507 जणांचा मृत्यू
– 24 तासांत देशात 1334 नवीन रुग्णांची भर पडली. 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
– देशात आतापर्यंत रुग्णांची संख्या 15712 झाली असून, एकूण 507 जण मृत्युमूखी पडले आहेत. 2231 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
– देशात आतापर्यंत 386791 जणांची कोरोना चाचणी झाली आहे. शनिवारी 37173 जणांची चाचणी घेण्यात आली. देशातील 755 कोविड-19 हॉस्पिटल आणि 1389 आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

लस आणि औषध चाचणीसाठी टास्कफोर्स
कोरोना व्हायरसवरील लस आणि औषध यावर संशोधन व चाचणीसाठी केंद्र सरकारने टास्कफोर्स स्थापन केला आहे. सरकारचे वैज्ञानिक सल्लागार, निती आयोगाचे सदस्य यांच्या नेतृत्वाखालील टास्कफोर्समध्ये आयसीएमआर, आयुष मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, बायोटेक्नॉलॉजी, सीएसआयआर, आरोग्य मंत्रालय, डीआरडीओ, औषध नियंत्रक या विभागातील सदस्य असणार आहेत.

हॉटस्पॉट, कंटेन्मेंट झोनमध्ये कोणतीही सूट नाही
आजपासून (दि. 20) अर्थव्यवस्थेशी निगडीत काही यंत्रणेत सूट मिळेल. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील अटी आणि शर्थींच्या आधारे नियम शिथील केले जातील. मात्र, ज्या शहरात, जिह्यात, विभागात कोरोनाचा प्रार्दूभाव कायम आहे अशा हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमध्ये सूट मिळणार नाही. तेथे संपूर्ण लॉकडाऊन कायम असेल. 3 मेपर्यंत देशभरात मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग सक्तीचे आहे, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.