57 हजार विद्यार्थ्यांनी रेखाटली ‘माझी मुंबई’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणार मुंबईचा गणेशोत्सव, जगात ख्याती मिळवलेला डबेवाला, कचरामुक्त मुंबई, मेट्रो-पेंग्विनची सफारी आणि सुरक्षित असलेल्या मुंबईच्या विविध रूपांचे दर्शन आज मुंबईभरातील मैदाने-उद्यानांमध्ये घडले. तब्बल 57 हजार 344 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौरांच्या वतीने आणि पालिकेच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

मुंबईची ओळख असलेले विविध विषय असलेल्या या स्पर्धेत पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पालिकेच्या  सर्व वॉर्डमधील 42 मैदाने उद्यानांमध्ये ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेदरम्यान महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी महापौर निवास, फाइव्ह गार्डन, एमआयजी क्लब, वांद्रे आदी ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. यावेळी नगरसेकिका रोहिणी कांबळे, प्रज्ञा भुतकर, नगरसेकक चंद्रशेखर कायंगणकर, अनिल त्र्यंबककर, सहाय्यक स्पर्धा प्रमुख दिनकर पकार आदी उपस्थित होते. या स्पर्धेतील वॉर्डस्तरीय यशस्वी 20 विद्यार्थ्यांना 500 रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर अंतिम गटात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक 25 हजार रोख-प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक 20 हजार रोख व प्रशस्तीपत्र आणि तृतीय क्रमांकाला रोख 15 हजार आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांची कल्पकता मुंबईला दिशा देणारी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महान व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रातून अचूक भाष्य करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. त्यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे खरोखरच मुंबईच्या विकासाला दिशा देणारी असल्याचे प्रतिपादन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी विद्यार्थ्यांची ही कल्पकला निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचेही ते म्हणाले.