बांगलादेशात 18 दिवसांत 6 हिंदूंची हत्या, हत्यांचे सत्र सुरूच, किराणा दुकानदाराचा निर्दयी खून

बांगलादेशात हिंदुंचे हत्यासत्र सुरूच आहे. फेसबुकवर बांगलादेशातील हिंसेवर चिंता करणारी पोस्ट लिहिल्यामुळे मणी चक्रवर्ती यांची हत्या करण्यात आली. गेल्या 18 दिवसांमधील ही सहावी हत्या आहे.

मणी चक्रवर्ती हे नरसिंगडी जिह्यात चारसिंदूर बाजारात किराणा दुकान चालवायचे. त्यांनी 19 डिसेंबर रोजी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्यात त्यांनी ते राहत असलेल्या परिसराला मृत्यूची दरी म्हटले होते. त्यानंतर सोमवारी रात्री त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. जखमी मणी यांचा रुग्णालयाच्या वाटेवर मृत्यू झाला.

हिंदूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

12 डिसेंबरला विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याचा मृत्यू झाला. त्यानंतर बांगलादेशात हिंसाचार उसळला आहे. हिंसाचारात हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात येत आहे. सर्वप्रथम उत्तर बांगलादेशातील मैमनसिंग जिह्यात कपडय़ाच्या कारखान्यात काम करणाऱया 27 वर्षीय दीपू चंद्रा दास याची जमावाने निर्दयी हत्या केली. तेव्हापासून सुरू झालेले हे हत्यासत्र थांबलेले नाही.