
1 शिवसेना ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे व राहील. हिंदुत्वाच्या विचारांशी शिवसेना प्रामाणिक होती व राहणारच. महाराष्ट्राच्या अखंडतेशी व मराठी माणसाच्या अस्मितेसाठी शिवसेनेने कधी प्रतारणा केली नाही व करणार नाही. शिवसेनेशी बेइमानी करणारे कोणीही असो, कितीही मोठे असो, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत.
सूचकः संजय राऊत
अनुमोदकः विनायक राऊत, आदेश बांदेकर, राहुल शेवाळे
2 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे संपूर्ण पक्षसंघटना भक्कमपणे उभी आहे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीवर संपूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी निर्णय घेण्याचे व अंमलबजावणीचे संपूर्ण अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात येत आहेत.
सूचकः अजय चौधरी
अनुमोदकः रवींद्र वायकर, उदयसिंग राजपूत
3 आगामी काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती निवडणुका जोमाने लढवून सर्वत्र शिवसेनेचा भगवा झेंडा डौलाने फडकविण्याचा निर्धार करीत आहे.
सूचकः सुनील राऊत
अनुमोदकः नितीन देशमुख, राहुल पाटील
4 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांनी शिवसेनेची निर्मिती झाली. शिवसेना आणि बाळासाहेब या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्या विलग करता येणार नाहीत आणि ते कोणीही करू शकणार नाही. म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेना पक्षाव्यतिरिक्त कोणालाही वापरता येणार नाही.
सूचकः अरविंद सावंत
अनुमोदकः धैर्यशील माने, श्रीरंग बारणे
5 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बजावलेल्या कामगिरीबद्दल व देशात तसेच जगभरात संपादन केलेल्या गौरवाबद्दल सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राला विकासात अग्रेसर केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
सूचकः भास्कर जाधव
अनुमोदकः राजन साळवी, कैलास पाटील
6 कोस्टल रोड, मेट्रो रेल मार्ग, 500 फुटांच्या घरांना करमाफी अशा लोकहिताच्या निर्णयाच्या यशाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन! यापुढे या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचा निरंतर विकास होत राहील असा विश्वास आहे.
सूचकः सुनील प्रभू
अनुमोदकः रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्फेकर
































































