देवरुख येथे वर्षभरात ६५ जोडप्यांनी केली विवाहनोंदणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामाना प्रतिनिधी । देवरुख

देवरुख शहरात विवाह नोंदणी नगरपंचायतीमध्ये बंद करुन ही नोंदणी शासन निकषानुसार ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्यात आली आहे. एक वर्षांच्या कालावधीत ६५ जोडप्यांनी आपली विवाह नोंदणी केली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या सुत्रांनी दिली. शासनाने विवाह नोंदणी अत्यावश्यक केली आहे. या नोंदणीची गरज पाल्यांच्या उच्च शिक्षणाप्रसंगी महत्वाची आहे.

विवाह नोंदणी ही पाल्यांच्या उच्च शिक्षणाबरोच वैवाहिक जीवनातही महत्वाची असते. मात्र अशी नोंदणी १०० टक्के जोडपी करतातच असे नाही. यापूर्वी विवाह नोंदणी ग्रामपंचायत, नगरपंचाय, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये होत होती. या ठिकाणी देखील विवाह नोंदणीचा ग्रामीण भागातील प्रतिसाद अत्यल्पच होता. गत वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून शासनाने एका आदेशाद्वारे विवाह नोंदणीचे अधिकार ग्रामीण रुग्णालयात करण्याचा जीआर काढला. मात्र ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय नाहीत तेथे विवाह नोंदणी ग्रामपंचायत मध्ये करण्याचे अधिकार कायम ठेवले आहेत.

या नोंदणीचे अधिकार नव्याने ग्रामीण रुग्णालयाला दिल्यानंतर नोंदणीचे कामकाज करणारे कर्मचारी अपुरे असल्यामुळे देवरुख मध्ये हे काम रखडले होते. अखेर अरोग्य विभागाने याची दखल घेऊन कर्मचारी नियुक्त केला.  यानंतर प्रत्यक्षात नोव्हेंबर २०१७ पासून जुलै २०१८ या ९ महिन्यांच्या कालावधीत ६५ जोडप्यांनी आपली विवाह नोंदणी देवरुख ग्रामीण रुग्णालयात करुन घेतली आहे. या नोंदणीसाठी विवाह झालेल्या पती – पत्नीचा शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, लग्नपत्रिका, चार पासपोर्ट आकाराचे फोटो, १०० रु. किंमतीचा एक कोर्ट फी स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, रहिवासी दाखला, विवाह फोटो, तहसीलदार यांच्या समोरील १०० रु . च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, ग्रामपंचायत अथवा नगरपंचायतीत विवाह नोंदणी झाली नसल्याचा दाखला अशा कागदपत्रांची आवश्यकता असते. यासाठीचा अर्ज ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात आला आहे.