
सामना प्रतिनिधी । पुणे
पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे दोन पंप पाटबंधारे विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केले आहेत. त्यातच पुणे महापालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाचे सुधारित दराने आकारण्यात आलेले पाण्याचे बिल आणि मागील थकबाकी अदा करण्यासाठी जायका प्रकल्पासाठी तरतूद केलेल्या 65 कोटीच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला आहे.
पाटबंधारे विभागाच्या करारानुसार शहरासाठी 11.5 टीएमसी एवढा पाणीसाठा मंजूर करण्यात आला आहे. मात्र ऑक्टोबर मध्ये पाटबंधारे विभागाच्या झालेल्या सुनावणी दरम्यान पुण्याला 8.16 टीएमसी पाणीसाठा निश्चित करण्यात आला आहे. शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामधून दोन लष्कर छावण्या, हॉस्पिटल्स, शाळा, एअरफोर्स, रेल्वे, ग्रामपंचायतींना अतिरिक्त पाणी पुरवठा होत असल्याचे पाटबंधारे विभागाने वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. त्याची दाखल पालिकेने घेतली नाही, त्यामुळे वापरण्यात येणाऱ्या जादा पाण्याचे अतिरिक्त बिल पाटबंधारे विभागाकडून मागण्यात येते. सध्या पालिकेकडून अंदाजे 17 टी.एम.सी एवढा पाण्याचा वापर होतो. तो ठरून दिलेल्या कोटा 8.2 टीएमसी पेक्षा जास्त असल्याने पाटबंधारे विभागाकडून अतिरिक्त रक्कमेची मागणी करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये पालिकेला थकीत रक्कम अदा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पालिकेने जायका प्रकल्पासाठी 70 कोटीची तरतुद केली आहे. त्या मधून 65 कोटीचे वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीच्या पुढे ठेवला आहे.































































