डिंभे ६५ टक्के भरले; पाणलोट क्षेत्रात संततधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
khadakwasla dam water
खडकवासला धरणातून सोमवारी सकाळी १० वाजता ३४२४ क्युसेक्स लीटर पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात येणार आहे.

सामना प्रतिनिधी । भीमाशंकर

पुणे व नगर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या ८ दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे धरण ६५ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापि पावसाचा जोर सुरू असल्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

भीमाशंकर अभयारण्य व तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सर्व ओढे, नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे डिंभे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्याच्या पावसाचे पाणी ओढे व नाल्यांच्या माध्यमातून डिंभे धरणात जमा होत आहे.

सध्या धरणात ६५ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे, तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार होत असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळीत सातत्याने वाढ होत आल्याचे पाहून सावधतेचा उपाय म्हणून रात्रभर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात टप्याटप्यात वाढ करण्यात येत होती.

पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस रविवारी पडल्याची माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली. अनेक गावांच्या पाणी योजना घोडनदीवर अवलंबून असून, त्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. घोडनदीपात्रातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणाच्या खालील भागातील क्षेत्रातील पडलेल्या पावसाच्या पाण्याने घोडनदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.

सावधानतेचा इशारा
मायना (डिंभे धरणाच्या) पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या सांडव्यातून पाणी घोडनदीपात्रात सोडावे लागणार असून महसूल, पोलीस यंत्रणेला आणि नदीकाठीच्या गावांनी दक्षता घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.