ठाण्यातील तीन मतदारसंघांत 66 उमेदवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याच्या दिवशी शुक्रवारी तिन्ही लोकसभा मतदारसंघांतून 9 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात 66 उमेदवार उभे ठाकले आहेत. यात ठाणे लोकसभा मतदारसंघात 23, कल्याण मतदारसंघात 28 तर भिवंडी मतदारसंघातून 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली.

ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांत शुक्रवारी अर्ज माघारीच्या दिवशी विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांतून 66 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.

ठाणे लोकसभा मतदारसंघात अर्ज छानणी प्रक्रियेनंतर 25 उमेदवार रिंगणात राहिले होते. त्यात शुक्रवारी अर्ज माघारीच्या दिवशी रिपब्लिकन पार्टीचे विजय घाटे यांच्यासह मोहम्मद सलीम मोहर अली चौधरी अपक्ष या दोन उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात 23 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. यात शिवसेनेचे राजन विचारे, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे, वंचित आघाडीचे मलिकार्जुन पुजारी यांच्यासह विविध उमेदवार रिंगणात आहेत.

वॉटर टँक, कारंजा, बॅटरी
या वेळी अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटपदेखील करण्यात आले. यात वॉटर टँक, कारंजा, रिक्षा, एअर कंडिशनर, चावी, कॅमेरा, कपबशी, हिरवी मिर्ची, खाट, बॅटरी टॉर्च, द्राक्षे, बॅट आदी चिन्हांचा समावेश असल्याची माहिती ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

कल्याणात 28 उमेदवार
कल्याण लोकसभा मतदारसंघातून अर्ज माघारीच्या दिवशी 32 उमेदवारांपैकी 4 उमेदवांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज माघारी घेणाऱ्यांमध्ये जोतीराम तुकाराम सरोदे, देवेंद्र जगदीश सिंह, सुरेंशकुमार अमरनाथ पाल आणि संदेश भीमराव इंगळे या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

भिवंडीत 15 उमेदवार मैदानात
भिवंडी लोकसभा क्षेत्रात अर्ज माघारी दिवशी सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा व कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील या दोन प्रमुख उमेदवारांसह अपक्ष योगेश कथोरे या तिघांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात भाजपा व काँग्रेस या दोन प्रमुख उमेदवारांसह एकूण 15 उमेदवार राहिले आहेत. त्यात भाजपचे कपिल पाटील व काँग्रेसचे सुरेश टावरे यांसह वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अरुण सावंत हे प्रमुख उमेदवार असून त्याशिवाय डॉ. नुरुद्दीन निजाम अन्सारी – समाजवादी पक्ष, अन्सारी मुमताज अब्दुल सत्तार – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, किशोर रामभाऊजी किनकर – भारत प्रभात पार्टी, फेरोज अब्दूर रहीम शेख – जन अधिकार पार्टी, संजय गणपत वाघ – भारतीय ट्रायबल पार्टी व इतर कपिल यशवंत ढमणे, कपिल जयहिंद पाटील, दीपक पंढरीनाथ खांबेकर, नाविक हसन मोमीन, नीतेश रघुनाथ जाधव, बाळाराम विठ्ठल म्हात्रे, सुहास धनंजय बोंडे यांचा समावेश आहे.