
सामना ऑनलाईन । नागपूर
गेल्या वर्षभरात वर्धा जिह्यात तब्बल 71 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. वर्धा जिह्यात 2015 मध्ये सर्वाधिक 139 शेतकरी आत्महत्या झाल्या. 2016 मध्ये 93 शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली. 2017 मध्ये 76 तर 2018 मध्ये 71 शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. कुठे यंत्रणेकडून शेतकरी नागवला गेला तर कुठे निसर्गाचा मार बसला. यवतमाळ जिह्यात महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव पाटील-करपे यांनी पत्नी आणि चार मुलांसह वर्धा येथील कुष्ठधामात आत्महत्या केली होती. ही महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाची पहिली सामूहिक आत्महत्या होती. 19 मार्च रोजी या दुर्घटनेला 33 वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर सरकारी दफ्तरातून वर्धा जिह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

























































