दहावीच्या प्रथम भाषा परीक्षेत, 71 कॉपीबहाद्दरांना पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेस आज प्रारंभ झाला. नाशिक विभागातून 2 लाख 7 हजार 985 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. शुक्रवारी प्रथम भाषेच्या परीक्षेत विभागात 71 कॉपीबहाद्दरांना भरारी पथकांनी पकडले. त्यात सर्वाधिक जळगावच्या 69 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

नाशिक जिह्यातून 94 हजार 533, धुळ्यातून 29 हजार 714, जळगाव येथून 62 हजार 492 व नंदुरबार जिह्यातून 21 हजार 246 विद्यार्थी असे विभागात एकूण 2 लाख 7 हजार 985 विद्यार्थी प्रवीष्ट आहेत. त्यापैकी 1 लाख 70 हजार विद्यार्थ्यांनी आज शुक्रवारी प्रथम भाषेचा पेपर दिला. प्रत्येक जिह्यासाठी पाच अशी एकूण 20 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यात माध्यमिक, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण व प्रशिक्षक संस्थेचे अधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.

शुक्रवारी या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत नाशिक व धुळ्यात एकही कॉपीबहाद्दर आढळला नाही. नंदुरबार येथे 2, तर जळगाव येथे सर्वाधिक 69 कॉपीबहाद्दर विद्यार्थी सापडले. जळगावातील 69 पैकी धरणगावला 1, बहात्तरपूर येथे 3, अमळगाव येथे 13, दहिवड येथे 24, तर चाळीसगावजवळील वागळी येथे 28 कॉपीबहाद्दरांना भरारी पथकाने ताब्यात घेतले.