
देशाची परकीय चलनाची पुंजी 17 टक्क्यांनी वाढून 21.10 लाख कोटी रुपयांवर पोहोचली असल्याची आल्हाददायक बातमी असताना देशातील बँकांनी 71 हजार 542.93 कोटी रुपयांचे 6,801 घोटाळे केले असल्याची धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेने वित्तीय अहवालातून दिली आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात बँक घोटाळय़ाची 5 हजार 916 प्रकरणे उघडकीस आली होती. यात घोटाळय़ाची रक्कम 41 हजार 167.04 कोटी रुपये इतकी होती. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये घोटाळय़ाची प्रकरणं सर्वात जास्त असून त्यानंतर खासगी आणि विदेशी बँका असा क्रम आहे. घोटाळा झाल्यानंतर तो सरासरी 22 महिन्यांनंतर उघड झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट होते. गंभीर बाब म्हणजे 100 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला ती प्रकरणे तर सरासरी 55 महिन्यानंतर उघड झाली आहेत.




























































