
पदोन्नतीसाठी पात्र असतानाही बरेच पोलीस अधिकारी तसेच अंमलदार जाणीवपूर्वक पदोन्नती नाकारतात. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली असून पदोन्नती नाकारलेल्या तसेच भविष्यात पदोन्नती नाकारणाऱया अधिकारी, अंमलदारांवर कार्यवाही करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. अशा अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर बदली करण्यात यावी, अशी स्पष्ट सूचना असून, त्यानुसार कारवाई करण्यात येणार का याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.
बरेच पोलीस निरीक्षक हे सहाय्यक पोलीस आयुक्तपदासाठी पात्र असतानाही अनेक अधिकारी पदोन्नती नाकारतात. सहाय्यक आयुक्त होण्याऐवजी त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस ठाण्यात काम करण्यात जास्त रस असतो; परंतु यामुळे पदोन्नतीच्या प्रक्रियेत गडबड होते आणि अनेक निरीक्षकांना वरिष्ठ निरीक्षक म्हणून पोलीस ठाण्यात काम करण्याची संधी मिळत नाही. वारंवार असे प्रकार घडत असल्याने वरिष्ठ पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. यासंबंधी यापूर्वीच काढण्यात आलेल्या अध्यादेशानुसार पदोन्नती नाकारणाऱया अधिकाऱयांची अकार्यकारी पदावर नियुक्ती करण्यात यावी. तसेच पहिल्यांदा पदोन्नती नाकारणाऱया अधिकाऱयांची तिसऱया वर्षी होणाऱया पदोन्नतीच्या निवडसूचीत विचार करण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यानुसार आता कार्यवाही होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
75 निरीक्षकांनी पदोन्नती नाकारली
वर्ष 2022-23 व वर्ष 2023-24 या निवडसूचीतील जवळपास 75 पोलीस निरीक्षकांनी सहाय्यक पोलीस आयुक्त पदाची पदोन्नती नाकारली होती. त्यामुळे पदोन्नती नाकारणाऱया तसेच भविष्यात पदोन्नती न घेणाऱया अधिकाऱयांची गंभीर दखल घेण्यात येणार आहे. अशा अधिकाऱयांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, त्यांची अकार्यकारी पदावर नियुक्ती करण्यात यावी असे अध्यादेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहे व कार्यवाही न झाल्यास त्याला संबंधित घटकप्रमुख जबाबदार राहतील असे वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते.