
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या तासिका 1 जुलैपासून सुरू होणार असून, सर्व विद्यार्थ्यांना 75 टक्के हजेरी असल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही. तसेच अभ्यासक्रम, परीक्षा व निकालाचे वेळापत्रक अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे आदेश कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी दिले आहेत.
विद्यापीठाचा पदव्युत्तर विभाग, धाराशिव उपपरिसर येथील पदव्युत्तर विभागांचे शैक्षणिक सत्र आज 16 जूनपासून सुरु झाले. पहिल्याच दिवशी दोन्ही ठिकाणच्या सर्व पदव्युत्तर विभागांचे प्रमुख तसेच कायमस्वरूपी प्राध्यापक यांची सकाळी बैठक घेण्यात आली. दोन्ही ठिकाणच्या मिळून 60 पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘समर्थ पोर्टल’ द्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. येत्या 25 जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. प्रवेशासह विभागांच्या विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीस प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना कुलगुरु डॉ. विजय फुलारी म्हणाले, 2025-26 या शैक्षणिक वर्षात अकॅडमिक कॅलेंडरचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्यात येईल. विभागनिहाय प्रवेश समिती स्थापन करावी, तसेच 30 जूनपूर्वी तासिकांचे नियोजन करणत यावे. प्रवेश घेतानाच ‘अॅटी रौंगंग’ संदर्भात ‘अंडरटेकिंग’ भरून घेण्यातयेणार आहे. प्राध्यापकांनाही बायोमेट्रिक बंधनकारक करण्यात आले असून, विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या वर्कलोड प्रमाणे आठवड्यात 40 तास उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तसेच 2027 मध्ये विद्यापीठ ‘क्युएस रैंकिंग’ला सामोरे जाणार आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी दरवर्षी दोन संशोधन प्रकल्प व पाच | शोधनिबंध प्रकाशित करणे गरजेचे आहे. तसेच ‘पीएम उषा’ प्रकल्पांतंर्गतसर्व विभागांना ‘स्मार्ट क्लास रुम’ उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. प्राध्यापकांचे ‘कॅस ‘सह सर्व विषय वेळेवर मार्गी लावण्यात येतील. विद्यापीठाचे सर्व वेळापत्रक व नियमित काटेकोरपणे पाळावे, असे आवाहनही कुलगुरू फुलारी यांनी केले. ‘पदव्युत्तर’चे उपकुलसचिव माधव वागतकर, सविता जगताप, अभिषेक कदम व सहकाऱ्यांनी बैठकीचे नियोजन केले.
प्राचार्यांची आज बैठक
संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्रही १६ जूनपासूनच सुरू झाले आहे. संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक उद्या 17 जून रोजी सकाळी11 वाजता विद्यापीठ नाट्यगृहात घेण्यात येईल. बैठकीस कुलगुरु डॉ. विजय फुलारी मार्गदर्शन करणार आहेत. संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी बैठकीस उपस्थित राहणे बंधनकारक आहे.