‘कोल्हापुरातील 8 बसस्थानकांना मिळणार नवा लूक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इचलकरंजी, कागल, गडहिंग्लजसह जिल्ह्यातील आठ बसस्थानकांचे रुपडे आता पालटणार आहे. या बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी 11 कोटी 94 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, त्यांची कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

कोल्हापूर जिह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, वडगाव, गडहिंग्लज, कागल, मलकापूर, गगनबावडा तसेच वाठार या बसस्थानकांमध्ये प्रवाशांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. त्या प्रमाणात मूलभूत सोयी सुविधांची सातत्याने मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नांतून या आठ बसस्थानकांसाठी निधी मंजूर झाला आहे. यामध्ये इचलकरंजी, गडहिंग्लज बसस्थानक नूतनीकरणासाठी, तर जयसिंगपूर बसस्थानक विस्तारीकरणासाठी प्रत्येकी 2 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. वाठार बसस्थानक पुनर्बांधणीसाठी दीड कोटी, तर वडगाव बसस्थानक नूतनीकरणासाठी 1 कोटी 44 लाख रुपये मिळणार आहेत. शिवाय कागल, गगनबावडा व मलकापूर बसस्थानक नूतनीकरणासाठी प्रत्येकी 1 कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

नवीन इमारतीसह सुशोभीकरण, काँक्रिटीकरण, प्रसाधनगृह, हायमास्ट दिवे आदी कामे होणार आहेत. हे काम अन्य बसस्थानकांसाठी आदर्शवत ठरेल, असा विश्वासही सतेज पाटील यांनी व्यक्त केला.