
सिमेंट मिक्सर ट्रकच्या चाकाखाली आल्याने 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज मालवणी परिसरात घडली. आकाश कुमार अमरजित यादव असे मृताचे नाव आहे. अपघातप्रकरणी ट्रकचालक नागेश कासलेला मालवणी पोलिसांनी अटक केली.
आकाश हा मालवणीच्या खारोडी गावात राहत होता. आज सकाळी तो त्याच्या मित्रांसोबत खारोडी येथून मालवणी गेट नंबर 1 येथे मित्राला भेटायला गेला होता. मित्राला भेटून तो मोटारसायकलने जात होता. आकाश मागच्या सीटवर बसला होता. त्याचदरम्यान मालवणी गेट नंबर 1 येथून सिमेंटचा ट्रक जात होता. आकाशच्या मित्राने ट्रकला कट मारली. कट मारल्याने आकाश खाली पडल्याने तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. अपघाताची माहिती समजताच मालवणी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी आकाशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातप्रकरणी मालवणी पोलिसांनी ट्रकचालक नागेशला ताब्यात घेऊन अटक केली. नागेशला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.























































