माढा तालुक्यातील रिधोरी गावातील पुरात अडकलेले 8 जण सुखरूप, 28 जणांना सुरक्षित स्थळी नेण्यात यश

सोलापूर जिल्ह्यातील भीमा व या दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.  नद्या मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने पुराचे पाणी आजूबाजूच्या गावात बसून धोका निर्माण झाला आहे. आत्तापर्यंत सुमारे 200 पेक्षा अधिक कुटुंबियांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांच्याकडून, माढा तालुक्यातील रिधोरी गावातील पुरात अडकलेल्या 8 जणांना सुखरूपपणे बाहेर काढले. तर इतर 28 जणांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.

दक्षिण सोलापूर पंढरपूर अक्कलकोट उत्तर सोलापूर मोहोळ माढा या तालुक्यांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काल रात्रीपासून पुन्हा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झालेला आहे.

दारफळ तालुका माढा येथे सीना नदीच्या पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकलेले आहेत. एन डी आर एफ ची टीम बचावासाठी गेली होती. परंतु पाण्याचा प्रवाह खूप मोठा असल्याने ते पाण्यात अडकलेल्या नागरिकापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे त्या गावातील नागरिकांना एअरलिफ्ट करून सुरक्षित स्थळी हलवण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.