मुंबईत 80 टक्के नालेसफाई पूर्ण, शहरात रोबोटकडून सफाई सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिकेने मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात आतापर्यंत एकूण 80 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये शहर विभागात दोन रोबोटच्या माध्यमातून काम सुरू आहे. 31 मेपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पालिकेकडून आता मुंबईभरातील नालेसफाई तीन टप्प्यांत वर्षभर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी पालिकेकडून 154 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 1 एप्रिल ते 31 मेपर्यंत 70 टक्के काम केले जाणार असून 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत या दुसऱया टप्प्यात 15 टक्के काम होणार असून 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 2020 पर्यंत तिसऱया टप्प्यात उर्वरित 15 टक्के काम केले जाणार आहे. यानुसार पालिकेने या वर्षी दहा दिवस आधीच म्हणजे 1 एप्रिलपासून नालेसफाईचे काम सुरू केले आहे. यामध्ये पावसाळापूर्व करण्यात येणाऱया 70 टक्के नालेसफाईपैकी 80 टक्के काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

असे झाले काम
शहरातील मोठे नाले – 77 टक्के
शहरातील छोटे नाले – 51 टक्के
पूर्व उपनगरातील मोठे नाले – 88 टक्के
पूर्व उपनगरातील छोटे नाले – 72 टक्के
पश्चिम उपनगरातील मोठे नाले – 80 टक्के
पश्चिम उपनगरातील छोटे नाले – 57 टक्के

रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांवर विशेष लक्ष
रेल्वे मार्गावर पाणी तुंबल्याने रेल्वे अनेक वेळा ठप्प पडते. रेल्वे प्रशासनाच्या कामावरून पालिकेवर आरोप केले जातात. या पार्श्वभूमीवर पालिका आणि रेल्वे प्रशासनाने नालेसफाईची संयुक्त पाहणी केली. ही नालेसफाई योग्य प्रकारे होत आहे की नाही याची पुन्हा एकदा संयुक्त पाहणी करून आढावा घेतला जाणार आहे.