कोयना येथे 80 मेगावॅटचा उदंचन जलविद्युत प्रकल्प उभा राहणार; महानिर्मितीकडून चाचपणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कोयना धरण पायथा येथे 80 मेगावॅटचा उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महानिर्मितीकडून चाचपणी सुरू असून लवकरच प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. सदरचा जलविद्युत प्रकल्प झाल्यानंतर महानिर्मितीला मर्यादित पाण्यावर दररोज वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे.

महानिर्मितीची सध्याची जलविद्युत निर्मितीक्षमता 2660 मेगावॅटच्या घरात असून पाणी उपलब्ध असताना येथून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करता येते. मात्र उन्हाळ्य़ात जेव्हा पाणीसाठा कमी होतो तेव्हा येथील वीजनिर्मितीवर मर्यादा येतात. त्याची दखल घेत महानिर्मितीने कोयना धरण पायथा येथे 80 मेगावॅट क्षमतेचा उदंचन वीज प्रकल्प उभारण्याबाबत हलचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे मर्यादित स्वरूपात असलेल्या पाण्यावर दररोज वीजनिर्मिती करता येणार आहे. यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तब्बल 400 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

घाटघर येथेही उदंचन प्रकल्प शक्य

सध्या महानिर्मितीचा घाटघर येथे 250 मेगावॅटचा उदंचन जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. त्याशिवाय येथे आणखी एक उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणे शक्य असल्याचे महानिर्मितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

काय आहे उदंचन जलविद्युत प्रकल्प

उदंचन जलविद्युत प्रकल्पांतर्गत उंचावर असलेल्या धणातील पाण्यावर दिवसभर वीजनिर्मिती केली जाते. वीजनिर्मितीनंतर खाली जाणारे पाणी मोठय़ा तलावात साठवले जाते. त्यानंतर जेव्हा रात्रीच्या वेळी विजेची मागणी कमी असते तेव्हा तलावातील पाणी पंपाच्या सहाय्याने धरणात टाकले जाते. तर दुसऱया दिवशी त्या पाण्याच्या माध्यमातून दुसऱया दिवशी वीजनिर्मिती करणे शक्य होते.