नगरमधील आठ हजार हेक्टरला गारपिटीचा तडाखा

नगर जिह्यात 18 मार्च रोजी झालेल्या गारपिटीत नऊ तालुक्यांतील शेतपिकांना फटका बसला आहे. या गारपिटीत 128 गावांतील 14 हजार 785 शेतकऱयांच्या सात हजार 841 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. सर्वांत जास्त नुकसान श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांना बसला असून, या ठिकाणी सहा हजार 981 शेतकऱयांचे तीन हजार 975 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

गारपिटीत जिह्यातील शेतकऱयांचे कांदा, गहू, मका, भाजीपाला, चारा पिके, ऊस, संत्रा, आंबा, डाळिंब, चिकू, लिंबू, द्राक्ष, टोमॅटो, ज्वारी, हरभरा या शेतपिकांसह झेंडू या फूलपिकाचे नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाने रविवारी केलेल्या संयुक्त पाहणीत नुकसानीची ही आकडेवारी समोर आली आहे. या गारपिटीतून अकोले, शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत आणि पारनेर तालुके बचावले असून, यामुळे नुकसानीची आकडेवारी मर्यादित राहिलेली आहे.

नगर तालुक्यातील 17 गावांत तीन हजार 459 शेतकऱयांचे एक हजार 687 हेक्टर, पाथर्डी तालुक्यातील सहा गावांत 520 शेतकऱयांचे 330 हेक्टर, जामखेड तालुक्यातील दोन गावांत 140 शेतकऱयांचे 65 हेक्टर, श्रीरामपूर तालुक्यातील 55 गावांतील सहा हजार 981 शेतकऱयांचे तीन हजार 975 हेक्टर, राहुरी तालुक्यातील चार गावांत 510 शेतकऱयांचे 210 हेक्टर, नेवासा तालुक्यातील 26 गावांत एक हजार 50 शेतकऱयांचे 310 हेक्टर, संगमनेर तालुक्यातील नऊ गावांत 950 शेतकऱयांचे 357 हेक्टर, कोपरगाव तालुक्यातील एका गावात 80 शेतकऱयांचे 57 हेक्टर, राहाता तालुक्यातील आठ गावांत एक हजार 95 शेतकऱयांचे 850 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

शनिवारच्या गारपिटीचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनला प्राप्त झाला असून, तो तातडीने विभागीय आयुक्तांमार्फत राज्य सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.