सातारा विभागात 805 एसटी कर्मचारी कामावर हजर, सातारा बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप 28व्या दिवशी सुरूच होता; मात्र खासगी शिवशाही बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढू लागली आहे. स्वारगेट व मुंबईकडेही प्रवाशांचा ओढा वाढला आहे. दरम्यान, सातारा विभागात 805 कर्मचारी हजर झाले.

सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, मेढा, महाबळेश्वर, वाई, पारगाव-खंडाळा, फलटण, कोरेगाव, दहिवडी, वडूज या 11 आगारांतील एसटी कर्मचाऱ्यांनी 7 नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. त्यामुळे एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नेहमी प्रवाशांची गर्दी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा बस स्थानकात संप सुरू झाल्यापासून शुकशुकाट जाणवत होता. मात्र, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सातारा बसस्थानकांत प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. तसेच स्वारगेट व मुंबईकडे जाण्यासाठी बस स्थानकावर प्रवाशांची विचारणा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवासी उपलब्ध होतील, त्यानुसार शिवशाही बसेस सोडण्यात येत आहेत.

सातारा आगारात सुमारे 15 चालक व वाहक हजर झाले आहेत. त्यामुळे सातारा आगारातून लिंब, सातारारोड यांसह अन्य ठिकाणी लालपरी रवाना झाली. दिवसभरात सातारा विभागात खासगी शिवशाही 48 व लालपरी बसच्या 92 फेऱया झाल्या. सुमारे 140 बसेस विविध मार्गांवर धावल्या, तर आतापर्यंत सुमारे 805 कर्मचारी कामावर हजर झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली.