एकाच जागी चिकटून बसलेल्या 32 पालिका अभियंत्यांची उचलबांगडी

66

 

 

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

नवी मुंबई महपालिकेत विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या 83 अभियंत्यांच्या प्रशासनाने बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये 32 अभियंते हे गेल्या अनेक वर्षांपासून वरिष्ठ आणि सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे एकाच ठिकाणी चिटकून बसले होते. प्रशासनाने कोणतीही भीडभाड न बाळगता त्यांना कात्रजचा घाट दाखवल्यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शहर अभियंता, अतिक्रमण आणि अन्य विभागात काम करणाऱ्या 83 अभियंत्यांच्या महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी बदल्या केल्या आहेत. हा बदल्यांचा सिलसिला सुरूच राहणार आहे. त्यामुळे क्रिम पोस्टिंगवर काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बदली झालेल्या अभियंत्यांपैकी 32 जण हे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून होते. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे त्यांना आहे त्या ठिकाणाहून हटवले जात नव्हते.

आरोग्य विभागातही बदल्या होणार

अभियांत्रिकी विभागाबरोबर अन्य विभागांमध्येही बदल्यांची प्रक्रिया राबण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करणाऱया कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना हटवण्यात येणार आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात येणार आहेत, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी व्यक्त केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या