नगरमध्ये 84 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच अवैध मद्य बाळगणे आदी प्रकरणात 4 हजार 428 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर आज वैदुवाडी येथे तब्बल 84 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सदरची कारवाई रात्री उशिरा झाली. या प्रकरणाबाबत चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता अंमलात आली. राज्यात काटेकोर पद्धतीने निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. दिनांक 11 मार्चपासून आजपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्यभरात पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर आज पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सावेडी उपनगर परिसरात वैदुवाडी येथे तब्बल 84 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याबाबत तपासणी सुरू असून चौकशीसाठी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना पाचारण करण्यात आले आहे. याबाबत चौकशी सुरू असल्याचं पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.