
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यास राज्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयात तर नोकऱयांत भूमिपुत्रांना 85 टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना दिले आहे. अन्य राजकीय पक्षांप्रमाणेच आम आदमी पक्षानेही आता लोकप्रिय घोषणाबाजीच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
खिचडीपूर गावात आयोजित ‘आप’च्या एका प्रचार रॅलीत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी वरील घोषणा केली. दिल्लीतील सर्व कंत्राटी कामगारांना कायम करण्यात येईल, दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाला घर देण्यात येईल आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थाही राखली जाईल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण मिळूनही कोणत्याच महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही.
…तर 24 तासांत कंत्राटी कामगारांना कायम करू!
कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी आम्ही दहा वेळा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर केला. त्याची फाईल केंद्र सरकारला पाठवली, पण त्यावर अजूनही निर्णय झाला नाही. केवळ दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसल्याने असे होत आहे. दिल्लीला पूर्ण राज्य केल्यास अवघ्या 24 तासांमध्येच कंत्राटी कामगारांना कायम केले जाईल, असेही आश्वासन केजरीवाल यांनी दिले.


























































