नऊ व्यापाऱयांकडून शेतकऱयांची 17 लाखांची फसवणूक; 6 गुन्हे दाखल

दिंडोरी व सिन्नर तालुक्यात 9 व्यापाऱयांनी 6 शेतकऱयांची 16 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गुरुवारी एकाच दिवशी 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सिन्नर तालुक्यातील दापूर येथील प्रभाकर दराडे यांच्याकडून पुण्यातील सनसवाडी येथील सुनील भोसुरे याने सोयाबीन व मका खरेदी करून त्यापोटीचे 2 लाख 24 हजार रुपये दिले नसल्याची फिर्याद दराडे यांनी वावी पोलिसांत केली.

दिंडोरी तालुक्यातील बोपेगावच्या साहेबराव भगरे यांच्याकडून ओझरखेड येथील विठ्ठल निखाडेने 105 क्विंटल द्राक्षे नेली. साडेचार लाखांपैकी सवालाख रुपये देण्यास तो टाळाटाळ केल्याने भगरे यांनी गुरुवारी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दिंडोरी तालुक्यातील पांडुरंग उखर्डे यांच्याकडून मुंबईतील नागेश शेट्टीने द्राक्ष, तर मालेगावच्या मोहम्मद आशिकीने टरबूज खरेदी केले. कसबे सुकेणे येथील दशरथ पवनेने यंदा द्राक्ष घेतले. या तिघांनी 5 लाख 43 हजार 689 रुपये थकवल्याची फिर्याद काल उखर्डे यांनी दिंडोरी पोलिसांत दिली.

दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेणे येथील शांताराम गणोरे यांना जांबुटके येथील रमेश आपसुंदे व नाशिकच्या परेश गंगाणी यांनी फसवले. सवापाच लाखांच्या 168 क्विंटल द्राक्षाच्या बदल्यात दिलेला 4 लाख 51 हजारांचा धनादेश बाऊन्स झाल्याने गुन्हा दाखल केला आहे. पुर्नोली शिवारातील अरुण माणिक नाठे यांच्याकडून मध्य प्रदेशातील आत्माराम जगदीश कोटकने मार्च 2017 मध्ये द्राक्ष घेतले, पण उर्वरित दोन लाख देण्यास टाळाटाळ केली. दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथील संजय भिकाजी केदार यांच्याकडून कोकणगावच्या शेख इक्बाल ए. रज्जाक ऊर्फ जावेद तांबोळीने सोयाबीन खरेदी केल्यानंतर सवा लाख थकवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या