
तेलंगणा राज्यातील 9 वर्षांचा मुलगा मधु कुमार याने एका अपघातात हातपाय गमावले. मात्र तरीही उमेद कायम ठेवत या चिमुरडय़ाने तोंडाने चित्र काढायला सुरुवात केली. अपघातानंतर अवघ्या सहा महिन्यांत मधु कुमार तोंडात पेन्सिल, ब्रश धरून चित्र काढू लागला. त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हात नसले म्हणून काय झाले, मी कुठेही मागे राहणार नाही, हेच मधूने दाखवून दिलंय.
मधुकुमार कामकोले गावात राहतो. 15 सप्टेंबर 2019 रोजी घराच्या गच्चीवर खेळत असताना तो खाली पडला. लोखंडी खांबावर आपटून त्याला मोठी दुखापत झाली. या अपघातात त्याला हातपाय गमवावे लागले. संपूर्ण कुटुंबावर हा मोठा आघात होता. मधुचे कसे होणार ही चिंता त्याच्या आईवडिलांना होती. मधुचे वडील पंक्चरचे दुकान चालवतात. त्यांची घरची परिस्थिती बेताची आहे.
आर्टिस्ट समुद्रला हर्षा यांना जेव्हा मधुची परिस्थिती समजली, तेव्हा त्यांनी त्याला तोंडाने चित्र काढायला शिकवायचे ठरवले. तसे प्रशिक्षण त्यांनी मधुला दिले. मधुने अवयव गमावले असले तरी त्याची कलेची आवड कायम आहे. मधु आज अनेकांची प्रेरणा बनला आहे, असे समुद्रला हर्षा सांगतात.
काही महिन्यांपूर्वी शाळेच्या कार्यक्रमात मधूने आपली कला सादर केली होती. त्यावेळी अनेकांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
मी सहाव्या इयत्तेत आहे. माझा अपघात झाल्यानंतर मी अवघ्या काही दिवसांत चित्रकला शिकलो. हात नसल्यामुळे तोंडात ब्रश धरून चित्र काढतो. मला अनेकांनी मदत केली. त्यामुळेच हे साध्य झालं. अनेकांसाठी मी प्रेरणास्रोत बनलोय, याचा आनंद आहे. – मधु कुमार, तेलंगणा


























































