
गोव्यात आज कोरोनाचे 90 रुग्ण सापडले आहेत. तर 95 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सोमवारी माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे कोरोना बळींचा आकडा आठ झाला आहे. डॉ. आमोणकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी आमोणा येथे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह समर्थक उपस्थित होते.
राज्यात आतापर्यंत 1 हजार 903 रुग्ण सापडले असून त्यातील 739 सक्रिय आहेत. आतापर्यंत 1 हजार 156 रुग्ण बरे झाले असून मृतांचा आकडा 8 झाल्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या 739 रुग्णांमध्ये 116 जण रस्ता, ट्रेन आणि विमानमार्गे गोव्यात आलेले आहेत. मांगोर हिल मधील रुग्ण कमी होऊ लागले आहेत. आज मांगोर हिल मध्ये फक्त 44 रुग्ण राहिले असले तरी मांगोर हिलशी निगडीत रुग्णांचा आकडा 242 असल्याने मांगोर हिल चिंतेचा विषय बनून राहिला आहे.
मडगाव मध्ये 23 रुग्ण सापडले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या साखळीत 44,इंदिरानगर-चिंबल मध्ये 29,फोंडा मध्ये 29 रुग्ण आढळले आहेत.
राजधानी पणजीच्या आसपास कामराभाट-टोंका येथे 7,चिंबल मध्ये 53,ताळगाव मध्ये 1,कुडका-शंकरवाडीत 4 रुग्ण आढळले आहेत. याच भागात पणजी मनपाचे स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने राहत असून मनपाने त्याना कामावर न येण्यास कळवले आहे.शहरातील कचरा उचलीवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. इतर ठिकाणच्या कर्मचार्यांच्या मदतीने इथली साफसफाई करावी लागत आहे.




























































