आमच्या पक्षातील 60 नगरसेवक फोडले त्यापैकी 90 टक्के उमेदवारांचा पराभव, संजय राऊत यांचा दावा

आमच्या हातात सत्ता आणि एवढा पैसा असता तर भाजपला देशही टिकवता आला नसता अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच आमच्या पक्षातील 60 नगरसेवक फोडले त्यापैकी 90 टक्के उमेदवारांचा पराभव झाला असा दावाही संजय राऊत यांनी केला.

आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आमच्या हातात सत्ता आणि एवढा पैसा असता तर भाजपला देशही टिकवता आला नसता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद टिकवू शकले नसते आणि एकनाथ शिंदे यांनाही आजचे पद राखता आले नसते. आमच्या पक्षातील 60 नगरसेवक फोडले गेले. त्यापैकी सुमारे 90 टक्के उमेदवारांचा पराभव झाला. तुम्ही कोणतेही नाव सांगा, मी लगेच त्यांचा मतदारसंघ सांगू शकतो. शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेले बहुतेक सर्व नगरसेवक पराभूत झाले असे संजय राऊत म्हणाले.

भाजपच्या विजयावर भाष्य करताना ते म्हणाले, भाजपने मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. लोकशाही आहे. सत्ताधाऱ्यांच्या हातात सत्ता आणि पैसा असतो. काल मी अखिलेश यादव यांचे वक्तव्य ऐकले. सत्ता असलेल्या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणे सोपे जाते, हा जवळपास सर्व राज्यांचा अनुभव आहे.

काँग्रेसच्या भूमिकेबाबत ते म्हणाले, काँग्रेसची रणनीती योग्य होती. त्यांनी निवडणूक लढवली आणि त्याचा फायदा झाला. आम्ही अजून 10–12 जागा वाढवू शकलो असतो. ते पुढे म्हणाले, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर मिळून आम्ही एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करू. मुंबई अदाणीच्या घशात घालू देणार नाही. ठेकेदारांचे राज्य उलथवून टाकू असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.