
कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना असल्याचे सुरुवातीपासून सांगितले जात असले तरी गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत मुंबईत तब्बल अडीच हजार ‘नक्वदीपार’ ज्येष्ठांनी कोरोनावर मात केल्याची समाधानकारक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या दीड वर्षात 90 पेक्षा जास्त वय असलेल्या तब्बल 2738 जणांना कोरोनाची लागण झाली. मात्र यातील 2476 ज्येष्ठांनी कोरोनाला हरवले आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. यावेळी सहव्याधी असणारे आणि 50 ते 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱयांना कोरोनाचा धोका सर्वाधिक असल्याचा इशरा आरोग्यतज्ञांकडून देण्यात आला होता. त्यामुळे पालिकेने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच या धोक्याच्या इशाऱयानुसार कार्यवाही करण्यास सुरुवात केली. ‘चेस द व्हायरस’ मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन ज्येष्ठांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सहव्याधी असणारे, लक्षणे दिसणाऱया ज्येष्ठांचे विलगीकरण आणि आवश्यक सहायक उपचार करून कार्यवाही करण्यात आली. परिणामी ज्येष्ठांचे कोरोनाला हरवण्याचे प्रमाण वाढले. नक्वदी पार 2,737 वृद्धांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 2,476 वृद्धांनी कोरोनावर मात केली आहे. तर वर्षभरात 261 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पालिकेच्या कोरोना डॅशबोर्डवर पालिकेनी ही समाधानकारक आकडेवारी जाहीर केली आहे.
आकडेवारी काय सांगते
मुंबईत 50 ते 59 वर्षांपर्यंतच्या 1,22,941 जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये 60 टक्के पुरुष तर 40 टक्के स्त्रिया होत्या. यातील 3353 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 1,19,588 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
60 ते 69 वर्षे वयोगटातील 87,624 जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील 4350 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या वयोगटातील 83,247 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
70 ते 89 वर्षे वयोगटातील 48,213 जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील 3727 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 44 हजार 486 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
80 ते 89 वर्षे वयोगटातील 17,037 जणांना कोरोनाची लागण झाली असून 1813 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर या वयोगटातील 15 हजार 224 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.































































