चालक कंटेनरसह 93 फ्रिज घेऊन पसार

खंडाळा तालुक्यातील विंग येथील एका आंतरराष्ट्रीय कंपनीमधील फ्रिज भिवंडी येथील गोडाऊनमध्ये घेऊन जाण्याकरिता आलेल्या कंटेनरचालकाने 11 लाख रुपये किमतीचे 93 फ्रिज कंटेनरसह लंपास केले. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली.

विंग येथील एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये उत्पादित केलेले तब्बल 93 फ्रिज भिवंडी येथील कंपनीच्या गोडाऊनमध्ये घेऊन जाण्याकरिता नीलेश कोठावळे (वय 32, रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) यांच्या मालकीचा कंटेनर (एमएच-20, सीटी-3692) हा भाडेतत्त्वावर मागविण्यात आला होता. त्यानुसार विंग येथील कंपनीमध्ये कंटेनरचालक दिलशाद अली (रा. माथिया इमाली, दंड लच्छीपूर, राणीगंज, प्रतापगड, उत्तर प्रदेश) हा कंटेनर घेऊन आला होता.

कंटेनरमध्ये कंपनीतील अंदाजे 11 लाख तीन हजार 687 रुपये किमतीचे 93 फ्रिज भरून चालक दिलशाद अली हा भिवंडी येथील गोडाऊनकडे निघाला. मात्र, त्या ठिकाणी न जाता, खारघर टोलनाका येथून तो बाहेरील राज्यात गेल्याचा संदेश नीलेश कोठावळे यांच्या दूरध्वनीवर आला. हे निदर्शनास आल्यामुळे कोठावळे यांनी भिवंडी येथील गोडाऊनमध्ये चौकशी केली असता, साहित्य गोडाऊनमध्ये आले नसल्याचे व चालक दिलशाद अली याचा दूरध्वनी बंद असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तत्काळ नीलेश कोठावळे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला धाव घेत फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी चालक दिलशाद अली याच्याविरुद्ध कंटेनर अंदाजे पाच लाख रुपये, 11 लाख तीन हजार 687 रुपयांचे नवीन 93 फ्रिज असा 16 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई तपास करीत आहेत.