
पॉलिटेक्निक प्रवेशाला यंदा विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दहावीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे 97 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे तर 67 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशशुल्क भरून आपला अर्ज कन्फर्म केला आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाने पदविका प्रवेशाकरिता यंदा स्कूल कनेक्ट हा उपक्रम राबविला. या उपक्रमातंर्गत राज्यभरातील सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रशिक्षण संचालनालयाने मार्गदर्शन केले. याचा परिणाम आता प्रवेशावर होत आहे. पहिल्या टप्यात केवळ दहा दिवसात 90 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पदविका तंत्रज्ञानचे (पॉलिटेक्निक) प्रवेश यावर्षी 10 टक्क्यांनी वाढले होते. 69 हजार 705 विद्यार्थ्यांनी राज्यभरातील 367 संस्थांत प्रवेश घेतला होता त्याआधी 62 हजार 122 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यंदाही प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
राज्यभरातील सर्व विभागातील सहा लाखाहून अधिक दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपर्यंत संचालनालयांने स्कूल कनेक्ट हा उपक्रम पोहोचविला. त्यामुळे अभ्यासक्रमाचे महत्व आणि संस्थांची माहिती दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली आहे. कोरोना काळातही पॉलिटेक्नीकच्या जागांवरील प्रवेश तीन वर्षांत 30 टक्क्यांनी वाढले होते. शैक्षणिक अभ्यासक्रम शिष्यवृत्ती योजना, प्रवेश प्रक्रिया, रोजगारांच्या उपलब्ध संधी आदी माहिती शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारीत फेसबुक, ट्विटर आणि इतर डिजीटल माध्यमांद्वारे प्रसिध्द केली आहे. याद्वारे संस्था आणि महाविद्यालयांनी तंत्रनिकेतनातील प्रवेशाबाबत जनजागृती व स्कुल कनेक्ट प्रोग्राम राबविण्यात असल्याने गतवर्षी झालेल्या प्रवेशापेक्षा यंदा मोठी वाढ होणार असल्याचा विश्वास वर्तविण्यात येत आहे.




























































