
जिह्यात मानव आणि बिबटय़ा यांच्यातील संघर्ष सतत वाढत असून, वन विभागाने अहिल्यानगर जिह्यातील तब्बल 970 गावे ‘बिबट्याप्रवण क्षेत्र’ म्हणून जाहीर केली आहेत. कर्जत, जामखेड आणि पाथर्डी हे तीन तालुके वगळता इतर 11 तालुक्यांत बिबटय़ांचा वावर वाढलेला दिसत आहे.
गेल्या महिन्यात कोपरगाव आणि अहिल्यानगर तालुक्यात झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात दोनजणांचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले. अनेक गावांमध्ये बिबटय़ाचे दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत आहेत.
डेहराडून येथील वन्यजीव संस्थेच्या अभ्यासानुसार, अहिल्यानगर जिह्यात अंदाजे 1150 बिबटे आहेत. ऊस, मका, नेपियर गवत, फळबागा तसेच नदीकाठच्या भागांमध्ये बिबटय़ाला लपण्याची जागा उपलब्ध असल्याने त्यांचा वावर वाढत आहे. त्यातच आता ऊसतोडणी सुरू झाल्याने बिबटय़ांचा वावर वस्ती आणि शहरांकडे वाढतो आहे. गेल्या पाच वर्षांत बिबटय़ाच्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला असून, 178 जण जखमी झाले आहेत. तसेच 11,168 पशुधन हानीग्रस्त झाले आहे. वर्ष 2024–25 मध्ये सर्वाधिक 8 जणांचा मृत्यू आणि 4,512 पशुधनाची हानी झाली असून, 6 कोटी 94 लाख 7 हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेने सर्व ग्रामपंचायतींना वन विभागाच्या मदतीने तातडीने जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. गावांमध्ये ‘बिबटप्रतिबंध आणि सुरक्षा’ सूचना फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामसभा आणि विशेष बैठकीत वन विभागाच्या सूचनांचे वाचन करून गावकऱयांना माहिती देणे बंधनकारक केले आहे.
तालुकानिहाय बिबट्याप्रवण गावे
अकोले 191, संगमनेर 171, पारनेर 131, नेवासा 127, राहुरी 96, कोपरगाव 79, राहाता 61, श्रीरामपूर 56, शेवगाव 24, श्रीगोंदा 14 आणि अहिल्यानगर 20.
शाळांची वेळ बदलली
बिबट्याप्रवण गावांमधील शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या असून, सकाळी 9.30 ते दुपारी 4 अशी वेळ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायती, शिक्षण समिती आणि शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाशी समन्वय ठेवावा, असे आवाहन जि.प.चे सीईओ आनंद भंडारी यांनी केले आहे.



























































