
सामना प्रतिनिधी । नगर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी जनलोकपालच्या मुद्यावर २ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने या प्रश्नावर दुर्लक्ष केले आहे. त्याविरोधात २ ऑक्टोबरपासून राळेगण सिद्धीमध्ये उपोषण करण्याचा इशारा अण्णांनी दिला आहे.
जनलोकपालासाठी अण्णांनी देशामध्ये जनजागृती करुन लढा उभारण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक राज्यामध्ये दौरे करुन त्यांनी जनलोकपालाची माहिती सर्वसामान्यांपर्यत पोहचवली होती. केंद्र सरकारला ४ वर्ष पूर्ण झाले तरीही अण्णांच्या कोणत्याही पत्राची दखल केंद्र सरकारने कधीच घेतली नाही. वेळोवेळी अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारवर निशाना साधला होता. तसेच आपल्या भावनासुध्दा त्यावेळी व्यक्त केल्या होत्या. सरकार कोणत्याही प्रश्नांवर गंभीर नाही. पत्राला उत्तर देत नाहीत. जनलोकपालासाठी सरकार आग्रही नाही असे मुद्दे घेवून त्यांनी दिल्ली येथे आंदोलनही केले होते.
अण्णांचे दिल्लीतील आंदोलन महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी पुढाकार घेत मागे घेण्यास भाग पाडले. त्यावेळीही पुन्हा आश्वासनाच्या व्यतिरिक्त अण्णांच्या पदरामध्ये काहीच पडले नाही. जनलोकपालसाठी अण्णांनी राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांना स्मरणपत्र पाठवले. सरकारने कृषीमुल्य आयोगाला स्वायत्तता देण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शेती मालाच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के जादादर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापपर्यंत आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोपही अण्णांनी या पत्रामधून केला आहे.
‘भ्रष्टाचार रोखण्यासाठी हा क्रांतीकारी निर्णय असताना मात्र, चार वर्षाच्या पार्श्वभूमीवर पान भरभरुन जाहिराती दिल्या. निवडणूक पूर्व भ्रष्टाचार मुक्तीचा नारा दिला होता. हे ते विसरले आहेत. चार वर्षात लोकपाल नियुक्त केले नाही ही बाब दुर्देवी आहे. म्हणजेच हिंदूस्थान भ्रष्टाचार मुक्त बनविण्याची आपली इच्छा नसल्याचे दिसून येत आहे,’ असे अण्णांनी म्हंटले आहे. या सर्व विलंबाच्या निषेधार्थ २ ऑक्टोबर पासून राळेगण सिध्दी येथे उपोषणास बसण्याचा इशारा अण्णांनी दिला आहे.























































