
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘मला जगण्याची इच्छा उरलेली नाही. आता मरायचंय बस्स’, असा ई-मेल संदेश सुनंदा पुष्कर यांनी मृत्यूच्या नऊ दिवस आधीच त्यांचे पती काँग्रेस नेते शशी थरूर यांना पाठवला होता. सुनंदा यांचे ई-मेल आणि सोशल मीडियावरील मेसेजेसनाच त्यांची मृत्युपूर्व जबानी मानण्यात यावी, असा आग्रह दिल्ली पोलिसांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात धरला.
सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह १७ जानेवारी २०१४ रोजी रात्री राजधानीतील एका तारांकित हॉटेलमध्ये सापडला होता. त्यांनी ‘आपणास आता मरायचंच आहे’ असा मेसेज ८ जानेवारी २०१४ रोजी थरूर यांना केला होता, असे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांना सादर केलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी नमूद केले आहे.
सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषप्रयोगाने झाला. तसेच त्यांच्या हॉटेलमधील रूममध्ये अप्राक्सच्या २७ गोळय़ा सापडल्या. मात्र सुनंदा यांनी किती गोळय़ा खाल्ल्या होत्या, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. त्यात सुनंदा यांचे पती शशी थरूर यांना आरोपी करण्यात आले आहे. त्यांनी पत्नीचा क्रूरपणे छळ केला होता, असा आरोप आहे.
पुढील सुनावणी ५ जूनला
सुनंदा पुष्कर प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ५ जून रोजी होणार आहे. शशी थरूर यांच्यावर ‘समन्स’ बजावायचे किंवा नाही, यावर त्या दिवशी निर्णय होणार आहे.

























































