न्यूझीलंडमध्ये दीड लाख गायींची कत्तल, वाचा काय कारण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वेलिंग्टन

न्यूझीलंडमध्ये येत्या काही महिन्यात दीड लाख गायींची कत्तल केली जाणार आहे. मात्र असा निर्णय घेण्यामागे कारण आहे तो गायींमध्ये गंभीर आजार पसरवणारा एक जीवाणू. येथे गायींमध्ये मायकोप्लाझ्मा बोविस हा जीवाणू आढळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.

न्यूझीलंडमध्ये लोकसंख्येच्या दुप्पट गायींची संख्या आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडची अर्थव्यवस्था ही दुग्धजन्य पदार्थाच्या व्यापारावर अवलंबून आहे. मात्र असे असतानाही गायींना संपवून टाकण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच मायकोप्लाझ्मा बोविस जीवाणू आढळला आहे. तर गेल्या वर्षी जुलै महिन्यात मायकोप्लाझ्मा बोव्हिस हा जीवाणू अमेरिका व युरोपात आढळून आला होता. या जीवाणूची लागण होताच गायींना मास्टिसिस, न्यूमोनिया, संधिवात व इतर रोग होतात.

न्यूझीलंडमधील ३८ शेतात हा जीवाणू सापडला असून या जीवाणूच्या संसर्गामुळे १४२ कृषिक्षेत्रांनाही फटका बसणार आहे. तसेच सरकार गायींच्या मालकांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील देणार आहे.

यातील संसर्ग झालेल्या गायींना मारून जमिनीत पुरण्यात येणार आहे. आतापर्यंत २४००० गाईंची कत्तल करण्यात आली असून आणखी १२८००० गाई मारल्या जाणार आहेत. यासाठी दहा वर्षांत ६१६ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढा खर्च येणार आहे.